ता.प्रतिनिधी
पातूर शहराच्या गजबजलेल्या तहसील कार्यालयासमोरून दुचाकीला अडकवलेली दीड लाख रुपयांची रोख रक्कम असलेली पिशवी चोरट्याने शुक्रवार (दि.२८) दुपारी १२ वाजताच्या सुमारास लांबवल्याने शहरात खळबळ उडाली. अत्यंत गर्दीचे ठिकाण असलेल्या तहसील कार्यालयासमोरच चोरट्याने शिताफीने ही चोरी केली.
पातूर तालुक्यातील देऊळगाव येथील रहिवासी समाधान सुपाजी ठाकरे (वय५३) यांनी कृषी उत्पन्न बाजार समिती, पातूर येथे शेतातील ३० क्विंटल हरभरा विक्री केला, व १ लाख ३७ हजार रूपये एका निळसर रंगाच्या पिशवीत घेऊन आपल्या दुचाकी क्रमांक एम.एच. ३० एएक्स ३३६८ ने पेट्रोल भरण्यासाठी वाशिम रोडवरील पेट्रोल पंपाकडे जात असताना पाठीमागून दुचाकीवरून येत असलेल्या दोन व्यक्तींनी त्यांना थांबवून तुमचे पैसे खाली पडले असे सांगितले असता पैसे पाहण्यासाठी मागे पाहिले असता अवघ्या काही मिनिटांतच मोठ्या शिताफीने चोरट्यानी गाडीला अडकलेली पैशांची पिशवी लांबवली. सदर घटनेनंतर समाधान ठाकरे यांनी पातूर पोलीस स्टेशन गाठून अज्ञात चोरट्यांविरोधात तक्रार दिली. सदर तक्रारीवरून पातूर पोलिसांनी अज्ञात आरोपींविरोधात अप. क्र. ३०३ (२) ३ (५) नुसार गुन्हा दाखल केला असून ठाणेदार हनुमंत डोपेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास पातूर पोलीस करीत आहेत.



