मुर्तिजापूर ता.प्रतिनिधि:
शिक्षणाच्या प्रवाहापासून दूर असलेल्या ग्रामीण भागातील होतकरू, हुशार आणि गरजू विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक दीपस्तंभ ठरलेल्या प्रकाशवाट प्रकल्पाने यंदाही यशाची नवी उंची गाठली आहे. प्रकाशवाट प्रकल्प टीम नागपूर, मुर्तिजापूर, तालुका शिक्षण समन्वय समिती तसेच शिक्षण विभाग मुर्तिजापूर यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणाऱ्या सुपर 50/2.0 जवाहर नवोदय विद्यालय मोफत शिकवणी वर्ग 2025 मधील 3 विद्यार्थ्यांनी नवोदय विद्यालय प्रवेशासाठी यश मिळवून प्रकल्पाच्या कार्याला मानाचा तुरा खोवला आहे.
न्यायमूर्ती अनिल किलोर यांच्या दूरदृष्टीतून साकारलेल्या या उपक्रमाचा मुख्य उद्देश म्हणजे ग्रामीण भागातील गरीब पण प्रतिभावान विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन मिळवून देणे. या उदात्त ध्येयातून सुरू झालेल्या सुपर 50 उपक्रमाचे हे दुसरे वर्ष असून, तालुक्यातील 40 गावांमधून निवडलेल्या 50 विद्यार्थ्यांना प्रत्येक शनिवार-रविवारी मोफत मार्गदर्शन दिले जाते.
विशेष म्हणजे, जिल्हा परिषद शाळांतील सेवाभावी शिक्षक स्वतःची सुट्टी त्यागून या विद्यार्थ्यांसाठी अध्यापन करतात. वर्षभरात सुमारे 80 दिवस चालणाऱ्या या वर्गांमध्ये 10 सराव चाचण्यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची तयारी भक्कम केली जाते. या सातत्यपूर्ण प्रयत्नांचेच फलित म्हणजे यंदा तालुक्यातून निवड झालेल्या 6 विद्यार्थ्यांपैकी ग्रामीण भागातील 3 विद्यार्थी हे सुपर 50 मधीलच आहेत.
या यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये सक्षम कांबळे (जि.प. शाळा विरहित), संविधान चंद्रमणी तायडे (जि.प. शाळा खांदला) आणि माही डाबेराव (जि.प. शाळा घुंगशी) यांचा समावेश असून त्यांनी जवाहर नवोदय विद्यालयात प्रवेश मिळवून आपल्या कुटुंबासह संपूर्ण तालुक्याचा अभिमान वाढवला आहे.
या उपक्रमाला मुर्तिजापूरचे लोकप्रिय आमदार हरिषभाऊ पिंपळे यांचे मोलाचे सहकार्य लाभत असून, गजानन महाराज बहुद्देशीय संस्थेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना गणवेश व शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून दिले जाते. तसेच समाजातील दानशूर व्यक्तींमार्फत विद्यार्थ्यांसाठी मोफत नाश्त्याची सोयही करण्यात येते.
शिक्षण विभाग, तालुका शिक्षण समन्वय समिती तसेच संबंधित शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक आणि विशेषतः गणित शिक्षक पवन बोळे यांचे योगदान या यशामागे मोलाचे ठरले आहे. त्यांच्या अथक प्रयत्नांमुळेच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना नव्या संधींचे दार खुले झाले आहे.
प्रकाशवाट प्रकल्प हा केवळ एक उपक्रम नसून, तो ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी आशेचा किरण ठरत आहे. या प्रकल्पातून घडणारे विद्यार्थी विविध क्षेत्रात आपले नाव उज्ज्वल करत आहेत, ही बाब विशेष उल्लेखनीय आहे.
दरम्यान, प्रकल्पाचे अध्यक्ष अविनाश बांबल यांनी सांगितले की, हा उपक्रम यापुढेही अधिक जोमाने सुरू राहणार असून 2026 साठी सुपर 50 निवड चाचणी येत्या 5 एप्रिल रोजी आयोजित करण्यात आली आहे. आतापर्यंत 300 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून, इच्छुक आणि पात्र विद्यार्थ्यांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले आहे.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना पंख देणारा ‘प्रकाशवाट’ प्रकल्प खऱ्या अर्थाने शिक्षण क्षेत्रात नवा आदर्श निर्माण करत आहे.





