प्रतिनिधी – आलेगाव
आलेगाव : इस्लाम धर्मातील पवित्र रमजान महिन्याची सुरुवात मोठ्या श्रद्धा आणि उत्साहात झाली असून मुस्लिम बांधवांनी पहिला रोजा भक्तीभावाने पाळला. चंद्रदर्शनानंतर गावात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून एकमेकांना शुभेच्छा देत रमजानचे स्वागत करण्यात आले.
इस्लाम धर्म हा कलमा, नमाज, जकात, रोजा आणि हज या पाच स्तंभांवर आधारित आहे. या पाच तत्वांना धर्मात विशेष महत्त्व असून त्यांचे पालन करणे प्रत्येक मुस्लिमासाठी आवश्यक मानले जाते. रमजान महिन्यात रोजा ठेवून अल्लाहची इबादत करणे, नमाज अदा करणे, कुरआन पठण करणे तसेच गरजूंची मदत करणे याला विशेष महत्त्व आहे.
आलेगाव येथे लहानांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सर्वांनी पहिला रोजा श्रद्धेने पाळला. विशेष म्हणजे कामरान खान इमरान खान (वय १२ वर्षे) या चिमुकल्याने तब्बल १३ तास ३२ मिनिटे अन्न-पाणी न घेता आपला पहिला रोजा पूर्ण करून सर्वांचे लक्ष वेधले. त्याच्या जिद्दीचे सर्वत्र कौतुक करण्यात येत असून गावातील ज्येष्ठांनी त्याला आशीर्वाद देत अभिनंदन केले.
रमजान महिन्यामुळे सध्या आलेगावमध्ये भक्तीमय वातावरण असून सर्वत्र इबादत, नमाज आणि सामाजिक ऐक्याचे सुंदर चित्र पाहायला मिळत आहे.





