मूर्तिजापूर | प्रतिनिधी
महाराष्ट्र शासनाच्या १७ फेब्रुवारी २०२६ च्या शासन निर्णयानुसार राबविण्यात येत असलेल्या “छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबीर अभियान” टप्पा क्र. १ अंतर्गत मूर्तिजापूर तालुक्यातील सातवे शिबीर शुक्रवारी (दि. २२ मे २०२६) राजस्व मंडळ माना अंतर्गत जिल्हा परिषद हायस्कूल, माना येथे उत्साहात पार पडले.
जिल्हाधिकारी अकोला मा. वर्षा मीना यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय अधिकारी . संदीपकुमार अपार व तहसीलदार कु. शिल्पा बोबडे यांच्या नेतृत्वात या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
शिबिरात महसूल विभागासह विविध शासकीय विभागांचे एकूण १५ स्टॉल उभारण्यात आले होते. यामध्ये पुरवठा विभाग, संजय गांधी योजना, महिला व बाल विकास, महावितरण, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ, आरोग्य विभाग, सेतू केंद्र, आधार सेवा, महिला बचत गट, दुय्यम निबंधक, भूमी अभिलेख, कृषी विभाग तसेच तक्रार निवारण कक्ष आदी विभागांचा समावेश होता.
नागरिकांना डिजिटल सेवा, ई-फेरफार, ई-मोजणी, अभिलेख दुरुस्ती, विविध प्रमाणपत्रांचे वितरण तसेच महसुली मार्गदर्शन एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तहसीलदार कु. शिल्पा बोबडे होत्या, तर माना ग्रामपंचायतीचे सरपंच.जमील कुरेशी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शिबिरादरम्यान तहसीलदारांनी विविध विभागांकडील प्रलंबित प्रकरणांचा आढावा घेतला. नागरिकांकडून प्राप्त झालेल्या १३ तक्रारींचा तातडीने निपटारा करून अहवाल सादर करण्याच्या सूचना संबंधित विभागांना देण्यात आल्या. कार्यक्रमाची प्रस्तावना निवासी नायब तहसीलदार. रविंद्र राऊत यांनी केली.
या अभियानात कूळ जमिनीबाबत वर्ग २ मधून वर्ग १ मध्ये रूपांतरणाची ५ प्रकरणे, कलम १५५ अंतर्गत ७८ फेरफार निकाली, ७/१२ दुरुस्तीसाठी १०४ अर्ज स्वीकार, १७३ डिजिटल ७/१२ वाटप, १०४ आठ-अ उतारे, तसेच विविध योजनांअंतर्गत ५९२ प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. एक खिडकी योजनेअंतर्गत १३ अर्ज निकाली काढण्यात आले. अशाप्रकारे एकूण १०६९ प्रमाणपत्रे मंजूर करण्यात आली असून त्यापैकी काही प्रमाणपत्रांचे मान्यवरांच्या हस्ते प्रतीकात्मक वितरण करण्यात आले.
यावेळी उपस्थित विभाग प्रमुखांनी शासनाच्या विविध योजनांची माहिती नागरिकांना सोप्या भाषेत दिली. मान्यवरांनी विविध स्टॉलना भेट देऊन कामकाजाची पाहणी केली. नागरिकांनीही स्टॉलना भेट देत विविध योजनांची माहिती जाणून घेतली.
कार्यक्रमाचे संचालन शिक्षक. वसंतराव कदम यांनी केले, तर आभार प्रदर्शन ग्राम महसूल अधिकारी. सागर काशिकर यांनी मानले.
या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मंडळ अधिकारी. प्रफुल्ल काळे, ग्राम महसूल अधिकारी सीता चाटे.सागर काशिकर, कु. पुनम घाटे. सुनील गेहोड. विवेक शेरात तसेच निवासी नायब तहसीलदार रविंद्र राऊत, नायब तहसीलदार दिनेश सोनोने व पुरवठा विभागाच्या कु. रुहीना अती यांनी विशेष सहकार्य केले.
दरम्यान, तहसीलदार कु. शिल्पा बोबडे यांनी मूर्तिजापूर तालुक्यात विविध ठिकाणी आयोजित करण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिरांचा लाभ शेतकरी, विद्यार्थी व सर्वसामान्य नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन केले आहे.


